पहा- ६३ वर्षीय सुरेश माने यांची अवघ्या २८ दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल सफर

0
4 MIN READ

आजही सायकलवरून शाळेला जाण्याचे ते रम्य दिवस आठवतात. तेव्हा वाटायचे की मोठे झाल्यावर तर आपल्याला मोटारसायकल किंवा चारचाकी गाडी चालवायला मिळणार. हे कल्पनाविश्व म्हणजे आपल्यासाठी अमूल्य दौलत असे. ६३ वर्षीय सुरेश माने यांची कहाणी ही नेमकी आपल्या कल्पनेपेक्षा वेगळी आहे. सेवा निवृत्त झाल्यावर त्यांनी आपली दुचाकी विकली, कारही देऊन टाकली आणि त्याऐवजी एक सायकल घेतली. सायकल नियमित चालवता यावी म्हणून एका कॉलेजमध्ये ते दाखल झाले. त्यांनी आपली सायकलस्वारी कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता काश्मीर ते कन्याकुमारी असा तब्बल २८ दिवसांचा प्रवाससुद्धा सायकलवरून केला.

यामागील त्यांची अफाट मेहनत आणि जिद्द लक्षात घेत हॅप्पी एजिंगच्या टीमने त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या त्यांच्या आगळ्यावेगळ्या दक्षिणोत्तर प्रवासाबद्दल जाणून घेताना सर्वच जण भारावून गेले.

सुरेश माने यांची बकेट लिस्ट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधून प्रशासकीय अधिकारी या पदावरून सेवा निवृत्त झालेले सुरेश माने माजी एअर फोर्स अधिकारी होते. पुण्यात ते त्यांच्या पत्नीसह गेली अनेक वर्षे वास्तव्य करत आहेत. त्यांना तीन मुली आहेत आणि त्या आपापल्या संसारात रममाण झाल्या आहेत. निवृत्तीला ६ महिने शिल्लक असताना त्यांनी आपली बकेट लिस्ट ((अशा इच्छांची यादी ज्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अपूर्ण राहिल्या) बनविली. त्यांच्या आवडत्या ४६ गोष्टी करायच्या हे त्यांनी ठरवले होते. नवे कपडे खरेदी करणे, सायकलिंग, पोहणे, उच्च शिक्षण घेणे या त्यांच्या यादीतील काही गोष्टी होत्या. आजवर त्यांनी यादीतील एकूण १२ इच्छा पूर्ण केल्या आहेत. पत्नीला घरकामात मदत करणे ही इच्छा सुद्धा त्या यादीत आहे हे पाहून कौतुकमिश्रित आनंद टीमच्या चेहऱ्यावर पसरला.

पहिली पायरी

जेव्हा सुरेश यांनी सायकलिंगला सुरुवात केली तेव्हा ते जिथे पदव्युत्तर शिक्षण घेत होते त्या कॉलेजमध्ये थोडा वेळ सायकल चालवीत असत. या दरम्यान त्यांची ओळख एका सायकलिस्ट्स (सायकल चालविणारे) ग्रुप सोबत झाली. या ग्रुपच्या संपर्कात आल्यावर त्यांना कळले की हा ग्रुप काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करणार आहे. सुरेश यांनी या वेळी हा प्रवास करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली. या ग्रुप मधील बाकी सदस्य त्यांच्यापेक्षा वयाने फारच लहान आणि सायकलिंगचा प्रदीर्ध अनुभव असणारे होते. परंतु, सुरेश यांचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून इतर सदस्यांनी त्यांना आपल्यासोबत या प्रवासात समाविष्ट करून घेण्याचे ठरविले.

या ग्रुपसोबतचा सुरेश यांचा पहिला प्रवास म्हणजे ‘अष्टविनायक यात्रा’. प्रवासाच्या सुरुवातीला त्यांना थोडे अवघड वाटत होते. हार न मानता त्यांनी जिद्दीने हा प्रवास पूर्ण करण्याचे ठरविले. आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांनी एकट्याने १२ किलो वजनासह  पुणे ते धारवाड हा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी कर्नाटक येथे स्थायिक असलेल्या त्यांच्या दोन्ही मुलींची भेट घेतली.

वय आणि शारीरिक स्थिती

सुरेश माने यांच्या दोन हर्नियाच्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या . त्याचप्रमाणे मणक्याचीही शस्त्रक्रिया झाली होती आणि यात त्यांना ६० टाके पडले होते. त्यांची मेडिकल हिस्टरी आणि वय पाहता त्यांच्या फॅमिली डॉक्टरनी सायकलिंग न करण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यांनी एका फिजिओथेरपिस्टला जो स्वतः एक सायकलिस्ट आहे, विचारले असता त्याने सायकलिंगला हिरवा कंदील दाखवला आणि प्रोत्साहनही दिले.  

कुटुंबाचा पाठिंबा

त्यांच्या इच्छांची यादी वाचल्यावर सुरुवातीला मानेंची पत्नी त्यांच्या सायकलिंगच्या योजनेबद्दल साशंक होती परंतु सुरेश यांचा आत्मविश्वास पाहून त्यांनी त्यांच्या सायकलिंगच्या योजनेला पाठिंबा दिला. सुरेश यांना ट्रेकिंगची आवड आहे आणि ते सातत्याने ट्रेकिंग करतात. त्यांनी उत्तर भारतातील ट्रेकिंगसाठी सर्वांत अवघड असलेल्या ठिकाणी आपल्या पत्नीला नेले त्यावेळी तिच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांत प्रेम, पाठिंबा, प्रार्थना हे सारे त्यांना दिसले आणि ते मनोमन सुखावले.

माने दांपत्याला तीन विवाहित मुली आहेत. त्यांपैकी दोन कर्नाटकमध्ये आणि एक पुणे येथे राहते. माने यांचा पुण्यात राहणारा जावई सायकलिंगची आवड जोपासणारा आहे आणि त्यानेही अशा तऱ्हेचे सायकल प्रवास यापूर्वी केले आहेत. त्यानेही आपल्या सासऱ्यांच्या या योजनेला पाठिंबा दिला.

सुरेश माने त्यांच्या परिवारासोबत

त्यांच्या इच्छांची यादी वाचल्यावर सुरुवातीला मानेंची पत्नी त्यांच्या सायकलिंगच्या योजनेबद्दल साशंक होती परंतु सुरेश यांचा आत्मविश्वास पाहून त्यांनी त्यांच्या सायकलिंगच्या योजनेला पाठिंबा दिला. सुरेश यांना ट्रेकिंगची आवड आहे आणि ते सातत्याने ट्रेकिंग करतात. त्यांनी उत्तर भारतातील ट्रेकिंगसाठी सर्वांत अवघड असलेल्या ठिकाणी आपल्या पत्नीला नेले त्यावेळी तिच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यांत प्रेम, पाठिंबा, प्रार्थना हे सारे त्यांना दिसले आणि ते मनोमन सुखावले.

माने दांपत्याला तीन विवाहित मुली आहेत. त्यांपैकी दोन कर्नाटकमध्ये आणि एक पुणे येथे राहते. माने यांचा पुण्यात राहणारा जावई सायकलिंगची आवड जोपासणारा आहे आणि त्यानेही अशा तऱ्हेचे सायकल प्रवास यापूर्वी केले आहेत. त्यानेही आपल्या सासऱ्यांच्या या योजनेला पाठिंबा दिला.

प्रवासाची तयारी

या प्रवास योजनेला प्रारंभ करताना माने आणि त्यांचे साथीदार यांना वजन नियंत्रणात ठेवण्याचा आणि प्रवासादरम्यान शाकाहार घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांच्या नाश्त्यामध्ये तूप किंवा लोणी लावून पराठा आणि जेवणामध्ये वरण भात किंवा दही भात या गोष्टी समाविष्ट होत्या.  तेलकट पदार्थ टाळण्यासोबत भरपूर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला. दुपारच्या उन्हात सायकल चालविताना ओला रुमाल डोक्यावर ठेवून शरीर थंड ठेवण्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

मोहीम

९ सायकलिस्ट्स काश्मीर ते कन्याकुमारी या मोहिमेसाठी सज्ज  

२४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या या मोहिमेला सुरुवात झाली आणि त्यांच्या ग्रुपने सर्व सायकल्स रेल्वेतून जम्मूला पाठविल्या. मोहिमेदरम्यान त्यांच्या जेवण्याची आणि राहण्याची सोया स्वामी विवेकानंद ट्रस्टमार्फत करण्यात आली. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी या पायी भारत यात्रेदरम्यान जो मार्ग अवलंबला होता त्याच मार्गाने या ग्रुपनेही मार्गक्रमण केले. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तापमानात होणारा बदल, शरीरातून वारंवार घामावाटे बाहेर पडणारे पाणी या काही ठराविक गोष्टी सोडल्यास बाकी प्रवास हा अत्यंत सुखद झाला. ४००० किमींचा हा प्रवास २८ दिवसांत सुरेश माने व त्यांच्या ग्रुपने यशस्वीरीत्या पूर्ण केला.

पुढचे पाऊल

सायकलिंगच्या पुढील योजनेविषयी त्यांनी उत्साहाने माहिती दिली. चंदिगढ ते खारडुंगला लेह-लद्दाख हा प्रवास यंदा करण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तर-दक्षिण मोहीम फत्ते केल्यानंतर आता त्यांना पूर्व-पश्चिम मोहीम करावयाची आहे . मुख्यत्वे तरुण सायक्लिस्ट्सचे जास्त ग्रुप्स असतात. ६० वर्षांच्या वरील सायक्लिस्ट्सचा एक ग्रुप बनविण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

जेव्हा लोक सेवानिवृत्त होतात तेव्हा ते नवीन काही न केल्यामुळे गतिहीन होतात. अशा सर्वांसाठी सुरेश माने हे एक उदाहरण आहे. वय किंवा अन्य शारीरिक अवस्था बाजूला ठेवून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कृतीतून त्यांनी नेहमी उत्साही राहण्याचा मंत्र दिला आहे. त्यांचा फिटनेस पाहून फक्त ज्येष्ठांनाच  नव्हे तर तरुणवर्गालाही भुरळ पडेल. हॅपीएजिंगच्या वतीने बकेट लिस्टमधील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सुरेश माने यांना शुभेच्छा आणि त्यांच्या जिद्दीला सलाम!

 

“All you need to know is that it’s possible.” – Wolf

Ask a question regarding पहा- ६३ वर्षीय सुरेश माने यांची अवघ्या २८ दिवसांत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल सफर

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here