2 MIN READ

गेल्या पन्नास वर्षांत भारतातील वयोवृद्धांची संख्या तिप्पट झाली आहे. जनगणनेनुसार जेष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७.७% इतकी आहे. वर्षनुवर्षे सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत आहे. ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी व्हावेत आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे हाच त्यांचा उद्देश आहे. आरोग्य सुविधांत, पेन्शन नियोजनात आणि जीवनशैलीत सुधार व्हावा यासाठी या योजना आखल्या जातात.

खाली आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने आणलेल्या काही योजनांची माहिती दिली आहे:

१. इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर ओल्डर पर्सन्स (IPOP)
हि योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाकडून चालवली जाते. अन्न, निवारा, वैद्यकीय सुविधा, करमणूक, इत्यादी ज्येष्ठ नागरिकांना पुरवणे हा या योजनेचा मुख्य उद्धेश आहे. यासाठी डे-केअर सेंटर्स, मोबाईल मेडिकल सेंटर्स, मल्टीफॅसिलिटी सेंटर्स, इत्यादी चालवणाऱ्या सामाजिक संस्थांना परवानगी दिली जाते. २०१६-२०१७ मध्ये, एकूण ३९६ वृद्धश्रमांना हि ग्रांट देण्यात आली ज्यामुळे ४०,२०० लाभार्थ्यांना फायदा झाला.

२. राष्ट्रीय वयोश्री योजना
राष्ट्रीय वयोश्री योजना ही सुद्धा सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाची योजना आहे. या योजनेअंतर्गत दारिद्रयरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धपकाळात आलेल्या अपंगत्वावर मात करण्यास मदत केली जाते. त्यांना व्हीलचेअर, चष्मा, कवळी, कुबड्या, श्रवणयंत्र इत्यादींचे वाटप केले जाते. ही योजना २६० जिल्ह्यांत राबवली जाणार आहे आणि २०२० पर्यंत याचे ५,२०,००० लाभार्थी असतील.

३. इंदीरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम
दारिद्रयरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य केले जाते. ६०-७९ मधील वृद्धांना २०० रुपये तर ८० वर्षावरील वृद्धांना केंद्राकडून ५०० रुपयांची मदत केली जाते.

४. वरिष्ठ पेन्शन विमा योजना (VPBY)
वित्त मंत्रालयाकडून हि योजना चालवली जाते. ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या सब्स्क्रिप्शन रक्ममेवर निश्चित परतावा मिळावा म्हणून ही सामाजिक सुरक्षा योजना चालवली जाते. याची अंमलबजावणी जीवन विमा आयोगाकडून केली जाते.

५. प्रधानमंत्री वय वंदना योजना
मे २०१७ मध्ये आलेली ही योजना VPBY चे सोप्पे स्वरूप आहे. या योजनेअंतर्गत, कमीत कमी १,५0,000 रुपये रोख भरल्यास तुम्हाला १000 रुपये दरमहा आणि जास्तीत जास्त ७,५0,000 रुपये रोख भरल्यास ५,000 रुपये दरमहा पेन्शन स्वरूपात मिळतील. यात तुम्हाला ८% चा निश्चित वार्षिक परतावा मिळेल, जो तुम्ही मासिक/तिमाही/ सहामाही/वार्षिक स्वरूपात घेऊ शकता.

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी खास योजनेची गरज असते. वरील योजनेच्या मार्फत सरकार देशातील ज्येष्ठ नागरिकांची मदत करत आहे. जर तुमच्या ओळखीत कोणी ज्येष्ठ नागरिक असेल आणि त्यांना अशा योजनांची गरज असल्यास त्यांना वरील योजनांची माहिती जरूर द्या.

Ask a question regarding माहिती करून घ्या वयोवृद्ध लोकांसाठी असलेल्या योजनांची

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here