भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यतः निर्माण होणाऱ्या दातांच्या समस्या

भारतात एकूणच दातांच्या आरोग्याविषयी उदासीनता दिसून येते. पन्नाशी ओलांडल्यावर या समस्या उग्र रूप धारण करतात. पाहूया अशा ५ समस्या:

0
3 MIN READ

1. दात पडणे

नैसर्गिक दात पडण्याची समस्या सामान्यतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येते. वय, आर्थिक आणि शारीरिक स्थिती, सवयी हे दात पडण्याला कारणीभूत असलेले मुख्य घटक आहेत. दातांच्या डॉक्टरकडे जाण्यातील अनियमितता, ब्रश न करणे या कारणांमुळे दात पडतात. यामुळे शरीराला आवश्यक असलेली फळे, भाज्या खाताना त्रास होतो. परिणामी, हवी ती पोषक तत्त्वे न मिळाल्याने मनुष्य आजारी पडतो.

2. दातांमध्ये पोकळी किंवा कॅविटी

अन्नपदार्थांचे कण दातांवर शिल्लक राहिल्याने बॅक्टेरिया निर्माण होतात. या बॅक्टेरियांना साखरेची जोड मिळाली की त्यांच्या रासायनिक प्रतिक्रियेमुळे दातांच्या वरील संरक्षक आवरण म्हणजेच इनॅमल हळूहळू नष्ट होते. यामुळे दात किडण्यास सुरुवात होते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही प्रक्रिया वेदनारहित असल्याने दातांमधील पोकळी लक्षात येत नाही. गोड पदार्थ, कोल्ड्रिंक्सचे सेवन, फ्लूरॉईड टूथपेस्ट ने दात न घासणे किंवा कमी वेळा दात घासणे यामुळे हा विकार होतो. तोंडाची दुर्गंधी, दातांत वेदना होणे, दातांमध्ये अन्नपदार्थ अडकणे ही पोकळी होण्याची लक्षणे आहेत.

3. हिरड्यांचे विकार

हिरड्या आपल्या दातांना सुरक्षित ठेवतात. घट्ट आणि पूर्णपणे निरोगी हिरड्या दिसतानाही सुंदर दिसतात. आपल्या तोंडात असणारे बॅक्टेरिया आणि अन्नपदार्थांचे कण मिळून हिरड्यांचे नुकसान करतात आणि हिरड्यांचे विकार जडतात. सूज, रक्त, दुर्गंध येणे ही हिरड्यांचा विकार झाल्याची लक्षणे आहेत. क जीवनसत्वाची कमतरता, डायबिटीजमुळे हिरड्यांवरील जखमा न भरल्या जाणे, नियमित दात न घासणे, जास्त गोड पदार्थ खाणे, मद्यपान, धूम्रपान करणे  ही हिरड्यांच्या विकारामागील प्रमुख कारणे आहेत.

4. सेन्सिटिव्हिटी

काही थंड आणि गरम, गोड – आंबट खाल्ल्यावर दातांमध्ये कळ येणे, म्हणजेच सेन्सिटिव्हिटी. दातांच्या वर डेंटिनचे आवरण असते. सर्वांत बाहेरील इनॅमलचे आवरण जर निघून गेले तर हे डेंटिनचे आवरण वर येते जे फार संवेदनशील असते. दात एकमेकांवर घासणे, दात किडणे ही सेन्सिटिव्हिटीची कारणे आहेत. यावर उपाय म्हणून विशिष्ट टूथपेस्ट व माऊथवॉश वापरण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर जोरजोरात दात न घासता ब्रश वर-खाली करून हळू दात घासण्यास सांगतात. काही दिवस सरबते, मादक पदार्थ, लिंबू, लोणची, टोमॅटो, व्हेजिटेबल सलाड न खाणे योग्य ठरते. एक चमचा मोहरीच्या तेलात सैंधव मीठ घालून दातांवर चोळणे, फ्लूरॉईड टूथपेस्ट वापरणे हे घरगुती उपायही केले जातात.

5. तोंड सुकणे

काही वृद्ध नागरीकांमध्ये औषधांच्या दुष्परिणामांमुळे तोंड सुकण्याची समस्या निर्माण होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने जर अशी औषधे बदलून आयुर्वेदिक औषधे सेवन केली तर तोंड सुकण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. नारळपाणी पिणे, काकडी-टोमॅटो खाणे यामुळे या आजारात थोडा आराम मिळू शकतो. तंबाखू व अन्य मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. दररोज दात घासणे गरजेचे आहे.

Read this here in English and Hindi

Ask a question regarding भारतीय ज्येष्ठ नागरिकांमध्ये सामान्यतः निर्माण होणाऱ्या दातांच्या समस्या

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here