सत्तरी ओलांडलेल्या नटुभाईंनी बांधल्या ज्येष्ठांच्या रेशीमगाठी

0
4 MIN READ

आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या जोडीदाराकडून काय अपेक्षा असू शकतील? बा. भ. बोरकर या कवीच्या शब्दांत सांगायचं झालं तर ‘वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल… भुलीतली भूल शेवटची’. अचानक एकटं सोडून गेलेल्या जोडीदाराच्या जाण्याचं दुःख पर्वताएवढं असतं नाही?

२६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमधील भुज येथे झालेल्या भूकंपाने असंच चित्र तयार केलं होतं. त्यावेळी नटुभाई पटेल केंद्र सरकारच्या नियोजन विभागात कच्छ येथे कार्यरत होते. सुदैवाने सुट्टीनिमित्त परगावी गेल्याने या भीषण भूकंपातून ते बचावले. परंतु त्यांनी पाहिलं की अनेकांचे जोडीदार, कुटुंबीय या भूकंपामुळे हे जग सोडून गेले होते. आर्थिक नुकसान तर झालंच होतं पण मनाला बसलेला धक्का पचवणं अवघड होतं. नटुभाईंनी स्वस्थ न बसता अशा एकट्या पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जोडीदार शोधण्याचं काम हाती घेतलं. हे पाऊल तत्कालीन परिस्थितीतील अत्यंत धाडसाचं होतं.

वयाची सत्तरी पार केलेले नटुभाई पटेल आता एकट्या पडलेल्या आणि नैराश्याने ग्रस्त ज्येष्ठ नागरीकांना सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी प्रयत्नरत आहेत. पुनर्विवाह किंवा लिव्ह- इन रिलेशनशिप्सद्वारे एकत्र राहण्यास वृद्ध जोडप्यांना प्रवृत्त करत आहेत.

२०११च्या जनगणनेनुसार वयाची साठी ओलांडलेले १०४ दशलक्ष ज्येष्ठ नागरीक भारतात आहेत. सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे हा आकडा २०२६ पर्यंत १७३ दशलक्ष पर्यंत जाण्याची शक्यता आहे. एका रिपोर्टनुसार या वृद्धांपैकी  ४.६ टक्के विधवा स्त्रिया आहेत. वृद्धत्व आपल्यासोबत आरोग्याच्या तक्रारी आणि सर्वांत कठीण गोष्ट म्हणजेच एकटेपण घेऊन येतं. जोडीदाराचं निधन झालं किंवा मुलं त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाली की आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. नटुभाई पटेल यांनी पुनर्विवाह किंवा लिव्ह- इन रिलेशनशिप्सच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचा आणि ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या वाटणीचा आनंद मिळवून द्यायचा जणू विडाच उचलला आहे.

नटुभाईंनी २००२साली या सेवाभावी कार्याला एका संस्थेचं स्वरूप दिलं. ‘विनामूल्य अमूल्य सेवा- अनुबंध फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सर्व वयोगटांतील नागरिकांसाठी जोडीदार शोधण्याचं मोलाचं कार्य त्यांनी हाती घेतलं. यामार्फत एक आश्चर्यजनक बाब त्यांच्या निदर्शनास आली. या संस्थेत येणाऱ्या तरुण वर्गापेक्षा वृद्ध नागरीकांचं प्रमाण जास्त होतं. जोडीदार हे जग सोडून निघून गेल्याने किंवा मुलांच्या व्यस्त आयुष्यात स्थान नसल्याने एकटं पडल्यावर उतारवयात वाटणारी जोडीदाराची गरज असण्याचं प्रमाण जास्त आहे हे त्यांना जाणवलं. मागील सोळा वर्षांत अनुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून ५५ विवाह मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आणि ५५ ते ८५ या वयोगटातील व्यक्तींचे १४८ पुनर्विवाह घडविण्यात आले.

अनुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून विवाहबद्ध होताना एक वृद्ध नवदांपत्य (फोटो सौजन्य- डेक्कन हेराल्ड)

‘एक चांगला जोडीदार सोबतीला असेल तर जीवनमान ५-६ वर्षांनी वाढू शकतं.’

ज्येष्ठांच्या पुनर्विवाहाबद्दल भारतीय समाजाची मानसिकता बदलणं हे नटुभाईंचं ध्येय आहे. त्यांनी तरुण वर्गाला आणि प्रौढांना याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे वयाच्या बंधनात न अडकता जोडीदाराबरोबर सुखद आयुष्य व्यतीत करण्याची दुसरी संधी ज्येष्ठ नागरीकांना मिळू शकते. नटुभाई म्हणतात की, ‘एक चांगला जोडीदार सोबतीला असेल तर जीवनमान ५-६ वर्षांनी वाढू शकतं.’

भारतात सुरुवातीला  लिव्ह- इन रिलेशनशिप्स ही संकल्पना अमान्य होती. परंतु अविवाहित प्रौढ लिव्ह- इन रिलेशनशिप्स मध्ये एकत्र राहू शकतात आणि हा गुन्हा ठरू शकत नाही असा दावा सुप्रीम कोर्टाने केला. लिव्ह-इन रिलेशनशिप्सचा फायदा असा की, आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदाऱ्या न उचलता नातं जपता येतं. हा निर्णय ऐकल्यानंतर विवाहबंधनात न अडकता ज्या वृद्धांना जोडीदारासोबत राहायचं आहे त्यांच्यासाठी नटुभाईंच्या संस्थेने २०१० मध्ये लिव्ह- इन रिलेशनशिप्ससाठी पहिलं संमेलन आयोजित केलं. या संमेलनाला ३०० पुरुष आणि ७० महिलांनी हजेरी लावली होती.

बऱ्याचदा भारतातील ज्येष्ठ नागरीक समाजातील प्रतिष्ठेच्या दबावाखाली येऊन पुनर्विवाह किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपच्या पर्यायावर फुली मारतात. समाज काय विचार करेल, मुले काय म्हणतील किंवा नव्या जोडीदाराला संपत्तीत हिस्सा कसा द्यायचा हा विचार करून अनेकांवर वृद्धपकाळात एकटं राहण्याची वेळ येते. परिणामी स्वतःची मुले जवळ राहत नसल्याने त्यांना केअरटेकरसोबत किंवा घरातील नोकरमाणसांसोबत राहण्याची वेळ येते.

एकटेपणा हा हळूहळू अंगात भिनत जाणाऱ्या विषासारखा आहे.

एकटेपणा हा हळूहळू अंगात भिनत जाणाऱ्या विषासारखा आहे.’ काही वेळा एकटेपणामुळे येणारं नैराश्य आत्महत्येस प्रवृत्त करतं’ असं नटुभाई म्हणतात. एकटेपणामुळे मानसिक स्थैर्य विचलित होणे, स्मृतिभ्रंश असे विकारही जडू शकतात. नटुभाईंच्या म्हणण्यानुसार आता चित्र बदलत आहे. सद्यस्थितीतील भावनिक गरज ओळखून पुनर्विवाहाचे स्वागत होताना दिसत आहे.

नटुभाई म्हणतात, “प्रेमाला वयाचं बंधन नाही आणि एकटं असताना उतारवयात प्रेम शोधणे यात काही गैर नाही.एकटेपणा दूर करण्यासाठीच नाही तर नैराश्य घालविण्यासाठी, सुखी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आपलं असं कुणीतरी हवं जे आपली काळजी घेऊ शकेल.” अनुबंध फाउंडेशनच्या माध्यमातून समाजमानसात हा बदल घडवणं  हे आपलं ध्येय असल्याचं नटुभाई सांगतात.

एक आई आपल्या पाच मुलांची काळजी निःस्वार्थ भावनेने घेते पण ही पाच मुले मिळून आपल्या एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत.

नटुभाई त्यांना आलेला एक अनुभव सांगताना म्हणाले, एका महिलेला काही वर्षांपूर्वी माझ्याकडे आणण्यात आलं. तिला ५ मुले होती. वडिलांच्या निधनानंतर त्यापैकी कोणीही आईची जबाबदारी घेतली नाही आणि तिला वाऱ्यावर सोडलं. भावनिक झालेल्या नटुभाईंनी म्हटलं, एक आई आपल्या पाच मुलांची काळजी निःस्वार्थ भावनेने घेते पण ही पाच मुले मिळून आपल्या एका आईची काळजी घेऊ शकत नाहीत. त्या महिलेच्या या खडतर परिस्थितीत अनुबंध फाउंडेशनने तिच्यासाठी नवा जोडीदार शोधला. आता ती सुखाने जीवन व्यतीत करत आहे. नटुभाई अशा मुलांचा निषेध करतात आणि त्यांना आवाहन करतात की वृध्दाश्रमाच्या प्रतीक्षा यादीत आपल्या पालकांचे नाव दाखल करण्याऐवजी त्यांच्यासाठी सुयोग्य जोडीदार शोधून आपली जबाबदारी पार पाडा.

नटुभाई पटेल आणि त्यांनी स्थापन केलेल्या अनुबंध फाऊंडेशनच्या प्रेरणादायी वाटचालीला ‘हॅप्पी एजिंग’चा सलाम. हा प्रपंच केवळ त्यांच्यासाठी ज्यांनी आपल्या वाढत्या वयात कायम भक्कम पाठिंबा दिला, नेहमी साथ दिली आणि आज ज्यांच्या एकटेपणात फक्त कुणाच्या तरी सहवासाची, आधाराची गरज आहे. प्रेमाची गरज आपल्या सर्वांना आहे आणि ज्यांनी आपल्याला ते भरभरून दिलं ते आपले वृद्ध पालक या प्रेमाला पात्र आहेत.  जर तुम्ही स्वतः एकटेपणातून जाणारे वृद्ध नागरीक असाल किंवा तुमचे पालक जोडीदाराविना एकटे पडले असतील तर हा व्हिडीओ जरूर पहा. तुमच्या विचारसरणीत झालेला एक छोटासा बदल तुमचं किंवा तुमच्या वृद्ध आई किंवा वडिलांचं आयुष्य सुखी करू शकतो.

Ask a question regarding सत्तरी ओलांडलेल्या नटुभाईंनी बांधल्या ज्येष्ठांच्या रेशीमगाठी

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here