पहा: ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध उपक्रम राबविणारे 75 वर्षीय पोपटलाल शिंगवी 

0
2 MIN READ

 

सामाजिक कार्य करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पण आनंद देण्यासाठी सामाजिक कार्य करणारे फार थोडे असतात. भारतात 104 दशलक्ष ज्येष्ठ नागरीक आहेत. ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. पण ज्येष्ठ नागरीक सामूहिकरीत्या कोणत्या सेवाकार्यात सामील होताना दिसून येत नाहीत. 

नवचैतन्य हास्य क्लबच्या माध्यमातून पोपटलाल शिंगवी हे कार्य फार उत्तमरीत्या करीत आहेत. स्वतः तर ते समाजसेवा करीत असतातच परंतु  बाकीच्या ज्येष्ठ नागरीकांना ते सेवाकार्यात सामील करून घेतात. 
 
याची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या मणक्याच्या आजारातून झाली. वयाच्या 61व्या वर्षी त्यांना स्पॉन्डिलायटिस (spondylitis) चा त्रास सुरु झाला. अगदी साध्या साध्या गोष्टीसुद्धा त्यांना करता येत नव्हत्या. तेव्हा त्यांनी रोज व्यायाम करण्यास सुरुवात केली आणि त्या आजारातून मुक्ती मिळवली. आरोग्य सुधारल्यावर त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला. 
 

‘हास्य’ हे ताणतणाव दूर करण्यासाठी उत्तम औषध आहे. सकाळी हास्ययोग केल्याने संपूर्ण दिवस मन टवटवीत राहते. पोपटलाल शिंगवी नवचैतन्य हास्य क्लबचे सचिव म्हणून कार्यरत असून इतर ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची त्यांनी जणू जबाबदारीच घेतली आहे. विविध मनोरंजक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून ते ज्येष्ठांना सतत व्यग्र ठेवण्याचे काम करतात.

भारतात डिप्रेशन आल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  5 आत्महत्यांपैकी प्रत्येकी 1 आत्महत्या ही 65 वर्षांवरील वयाच्या एखाद्या ज्येष्ठ नागरीकाची असल्याचे आढळून आले आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि गंभीर शारीरिक व्याधी हे ज्येष्ठांच्या आत्महत्त्यांमागील प्रमुख कारण आहे. अशाच एका आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या कॅन्सरग्रस्त ज्येष्ठ महिलेला पोपटलाल शिंगवी यांनी हास्य क्लब मध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला. आज ती महिला एक आंनदी आयुष्य जगत आहे. 

नैराश्य हा वयोमानाचा परिणाम नाही. व्यायाम आणि योगासने यांमुळे ज्येष्ठांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते आणि आत्महत्येपासून त्यांना परावृत्त करता येऊ शकते.  

त्यांनी आणखी एका श्रीमंत महिलेची गोष्ट सांगितली. दोन्ही मुले अमेरिकेत, पती हॉटेल व्यावसायिक आणि गडगंज संपत्ती असलेल्या अशा व्यक्तीचा आपल्याला नक्कीच हेवा वाटू शकेल. परंतु, खरे पाहता सोन्याच्या पिंजऱ्यात राहणारी ही महिला आतून फार पोखरली होती. तिलाही या हास्य क्लबने आणि इथल्या प्रेमळ ज्येष्ठ नागरीकांनी आधार दिला. 

समाजातील गरजू लोकांना मदत का केली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य का फुलविले पाहिजे? याचे उत्तर नक्कीच देणाऱ्याच्या आनंदी मनात दडले आहे. ‘देण्यातला निखळ आनंद’ अनुभवायचा असेल तर मदतकार्यात सामील होणे गरजेचे आहे. पोपटलाल शिंगवी यांनी याच आनंदाचा पाठपुरावा करत लाखो रुपयांची सामूहिक मदत शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी केली. वेश्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, अंध महिलांना मदत अशा सामाजिक उपक्रमांसाठी ते इतरांनाही प्रेरित करतात. आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्यांकडून ही मदत मिळवून गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या या कार्यासाठी त्यांनी वेगळा वेळ काढला आहे. 

सतत काहीतरी नवीन घडामोडी या जगात घडत आहेत. त्याप्रमाणे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करून घेणे ही काळाची गरज बनली आहे. पहिल्यांदा ज्येष्ठ नागरीक नवे काहीतरी शिकण्यासाठी फार उत्सुक नसतात पण त्यांना एकदा गोडी लागली की त्याबद्दल ते इतरांना सांगतात. या हास्य क्लबमध्ये त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात, सहली आयोजित केल्या जातात आणि यामुळे त्यांचे मन प्रसन्न राहते आणि आयुष्याविषयी आस्था वाटते. याचबरोबर मेडिटेशन स्पिरिच्युअल सोसायटी ऑफ इंडियाचे कामसुद्धा पोपटलाल शिंगवी करतात. यामध्ये बरेच ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात आणि योगासने, ध्यान इ. मार्फत शांतीचा अनुभव घेतात.   

ज्येष्ठ नागरीक त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यास पात्र आहेत. सामाजिक कार्यात सहभागी होऊन त्यांना असे आयुष्य जगण्यासाठी मदत करा आणि आधार द्या.

Ask a question regarding पहा: ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध उपक्रम राबविणारे 75 वर्षीय पोपटलाल शिंगवी 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here