2 MIN READ

भारतात वयोवृद्ध लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. १०४ दशलक्षांहून अधिक लोक ज्येष्ठ नागरीक या श्रेणीत मोडतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांच्या आत्महत्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. ५ आत्महत्यांपैकी प्रत्येकी १ आत्महत्या ही ६५ वर्षांवरील वयाच्या एखाद्या ज्येष्ठ नागरीकाची असल्याचे आढळून आले आहे. नैराश्य (डिप्रेशन) आणि गंभीर शारीरिक व्याधी हे ज्येष्ठांच्या आत्महत्त्यांमागील प्रमुख कारण आहे. तसेच यांतील काही आत्महत्त्या या गरीबीमुळेही होतात.

ज्येष्ठांमध्ये नैराश्य

नैराश्याने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना दिध्रुवीय मनोविकार (कधी निराशा तर कधी उन्माद असलेली अवस्था) आणि सतत मूड बदलणे यांसारखे त्रास होताना दिसतात. नैराश्याचा ज्येष्ठ नागरीकांच्या रोजच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. त्यांच्या शरीरातील ऊर्जेची पातळी, झोपेच्या वेळा आणि जगण्यातील स्वारस्य हे सर्वच बदलते. अशा व्यक्ती त्यांचे छंद, नाती-गोती अशा प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत उदासीन असतात.

परंतु, बऱ्याचशा ज्येष्ठ नागरीकांना वाटते की वयोमानामुळे नैराश्य येते, हा निसर्गनियम आहे. त्यामुळे ते त्याकडे दुर्लक्ष करतात. खालील कारणांमुळे ज्येष्ठ नागरीकांच्या नैराश्याकडे दुर्लक्ष केले जाते:

1. बऱ्याचजणांना असे वाटते की, वयोमानामुळे नैराश्य येते

2. बरेचसे ज्येष्ठ नागरीक एकटे राहत असतात आणि त्यांच्याकडे लक्ष देणारे कोणीच नसते

3. नैराश्यामुळे काही वेळा शारीरिक वेदना होतात आणि अशा वेदनांकडे जास्त लक्ष दिले जाते.

4. त्यांना स्वतःच्या आरोग्याविषयी चर्चा करत राहणे अयोग्य आहे असे वाटते.

सेवानिवृत्ती, कुटुंबातील जवळच्या सदस्याचा मृत्यू किंवा आर्थिक चिंता यांसारख्या कारणांमुळेही नैराश्य येऊ शकते.

हे आवर्जून वाचा: ज्येष्ठांमध्ये सोमॅटायझेशन डिसॉर्डर: कामी येतेय माइंडफुलनेस थेरपी

ज्येष्ठांना नैराश्य आल्याचे कसे ओळखाल?

खालील लक्षणांवरून ज्येष्ठांना नैराश्य आल्याचे ओळखता येऊ शकेल: 

 • अतीव दुःख
 • कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय होत असलेल्या वेदना
 • प्रत्येक गोष्टीपासून अलिप्त होणे आणि कशातच रस न वाटणे
 • समाजाशी संवाद टाळणे
 • अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे
 • जीवनाविषयी नकारात्मकता आणि दीनवाणे वाटणे
 • कमजोर झाल्यासारखे वाटणे
 • झोपेच्या वेळांमध्ये बदल
 • आत्माभिमान कमी होणे आणि स्वतःला कमी लेखणे
 • हालचाल आणि बोलणे मंदावणे
 • अल्कोहोल किंवा ड्रग्सचे अतिसेवन
 • आत्मघाताचे विचार
 • अल्पकाळासाठी किंवा दीर्घकाळासाठी स्मृतिभ्रंश
 • अंघोळ, औषधे किंवा जेवण विसरणे किंवा टाळाटाळ करणे आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करणे

ज्येष्ठ नागरीकांची काळजी घेणाऱ्यांना जर यांपैकी कोणती लक्षणे दिसली किंवा जर ते एकाकीपण किंवा जीवन संपवण्याविषयी बोलत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या या नैराश्याच्या काळात त्यांना तुमच्या आधाराची फार गरज असते. परंतु आपल्या भारतात नैराश्य या मनोविकाराकडे फार गंभीरतेने पाहिले जात नाही.

उलट अशा नैराश्याने ग्रस्त ज्येष्ठ नागरीकांनाच सांगितले जाते की ‘तुम्ही इतरांना आनंदी ठेवा’ आणि असे ‘नैराश्याचे विचार मनातून काढून टाका’. त्यांना अशा प्रकारे हे सांगणे अगदी चुकीचे आहे कारण निराश माणसाच्या कृतींवर नियंत्रण ठेवणे त्यांच्या स्वतःच्या आवाक्याबाहेरचे असते.

हे आवर्जून वाचाज्येष्ठांमध्ये एकाकीपणातून जन्म घेतेय मानसिक विकृती

नैराश्य हा वयोमानाचा परिणाम नाही. अन्य शारीरिक किंवा मानसिक विकारांप्रमाणेच नैराश्य या आजारासाठी सुद्धा वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. नैराश्याविषयी जागरूकता बाळगणे आणि उपचारांसाठी योग्य वेळी पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांची काळजी घेणाऱ्यांनी वैद्यकीय उपचारांविषयी त्यांना माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे ते त्यांच्या समस्यांविषयी ते मोकळेपणाने बोलू शकतील. व्यायाम आणि योगासने यांमुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यास मदत होऊ शकते आणि आत्महत्येपासून त्यांना परावृत्त करता येऊ शकते.  

ज्येष्ठ नागरीक त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर एक निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यास पात्र आहेत. त्यांना असे आयुष्य जगण्यासाठी मदत करा आणि आधार द्या.

Ask a question regarding ज्येष्ठांमधील नैराश्य ठरतेय आत्महत्येला कारणीभूत

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here