3 MIN READ

भारतातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांसमोर ‘आर्थिक समस्या’ हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी पूर्वी मोठमोठे उद्योगधंदे चालविले होते परंतु आता त्यांनी त्यांच्या वारसदाराला सर्व हक्क देऊन टाकले आहेत. जे ज्येष्ठ नागरीक खाजगी क्षेत्रात नोकरी करत होते त्यांनी आपली मालमत्ता त्यांच्या वारसदारांच्या नावावर केली आहे. एका सर्वेक्षणानुसार  ७५ टक्के भारतीय नागरीक पैशांसाठी जवळच्या किंवा दूरच्या नातेवाईकांवर अवलंबून असतात.

परंतु आता मात्र ज्येष्ठ नागरीकांना स्वतःच्या भविष्याची काळजी करण्याची गरज नाही कारण भारत सरकार आणि काही मोठ्या खाजगी कंपन्या आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुढे येत आहेत. २०१९ च्या अर्थसंकल्पातही ज्येष्ठ नागरीकांसाठी चांगल्या योजना  समाविष्ट केल्या आहेत. म्हणून जर आपण ६० वर्षांचे किंवा त्याहून मोठ्या वयाचे असाल तर आपल्यासाठी नक्कीच ही आनंदाची बाब आहे.

आपण भारताचे ज्येष्ठ नागरिक असल्यास आपल्याला हे फायदे मिळतील:

1. मेडिकल इन्शुरन्स घेतल्यास मिळकत करात मोठी सवलत: 

मिळकत करावर आधारित कलम ८० डी अंतर्गत ज्येष्ठ नागरीकांनी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर त्याद्वारे मिळकत करावर मोठी सवलत मिळविता येते. जर एखादी व्यक्ती पत्नी, मुले, स्वतः आणि ६० वर्षांखालील पालक यांचा विमा उतरवत असेल तर त्या व्यक्तीला मिळकत करात २५ हजार रुपयांची सवलत मिळते. तसेच जर एखादी व्यक्ती आपल्या ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पालकांचा वैद्यकीय विमा उतरवत असेल तर त्या व्यक्तीला मिळकत करात ३० हजार रुपयांची सवलत मिळते. म्हणजेच वरील माहितीच्या आधारे एका व्यक्तीला मिळकत करात अनुक्रमे एकूण ५५ किंवा ६० हजारांची सवलत मिळवता येऊ शकते.

2. मिळकत कर कपात

६० ते ८० वर्षांच्या ज्या जेष्ठ नागरीकांचे वार्षिक उत्पन्न  ३ लाखापर्यंतव आहे किंवा ८० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या  ज्येष्ठ नागरीकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपर्यंत आहे त्यांना मिळकत कर भरण्याची आवश्यकता नाही. ज्यांचे उत्पन्न याहून जास्त आहे त्यांना खालीलप्रमाणे मिळकत कर भरावा लागेल.

वयउत्पन्नकर
६० ते ८०  वर्षे३-५ लाख५%
५-१० लाख२०%
१० लाखांपेक्षा अधिक३०%
८०  वर्षे किंवा त्याहून अधिक५-१० लाख२०%
१० लाखांपेक्षा अधिक३०%

 

हे आवर्जून वाचानॅशनल ऑर्गन ट्रांसप्लांट प्रोग्राम वृद्धांना देणार नवजीवन

3. टीडीएसची बचत 

भारतातील बहुतेक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बचत खात्यातील व्याजावर अवलंबून असतात. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस, व्याजावरील करात सवलत मिळविण्यासाठी त्यांना १५ एचचा फॉर्म भरणे आवश्यक आहे. एका वर्षी मिळालेल्या व्याजदरात मिळणाऱ्या १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ज्येष्ठ नागरीकांना कर भरण्याची आवश्यकता नाही.

4. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (एससीएसएस)

ही योजना वेळेआधी सेवा निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरीकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरीक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेद्वारे जमा ठेवीवर ५ वर्षापर्यंत व्याज मिळते आणि मुदत पूर्ण झाल्यावर ३ वर्षापर्यंत या सुविधेचा लाभ घेता येतो. एससीएसएससाठी त्रैमासिक व्याज दर ८.७% आहे. सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम लोकप्रिय होण्यामागील मुख्य कारण म्हणजे यात इतर योजनांच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर आहे. तसेच कलम ८०डी अंतर्गतही मिळकत करात सवलत मिळविण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे.

5. बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर उच्च व्याज दर

बऱ्याच बँक मुदत ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर इतर गखातेधारकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरीकांना ०.५%जास्त व्याजदर देतात. यासाठी ज्येष्ठ नागरीकांकडे कर बचत खाते किंवा पेन्शन खाते असणे अनिवार्य आहे. हे व्याज ज्येष्ठ नागरीकांना मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक अशा हप्त्यांत दिले जाते. जर ही व्याजाची आणि मुद्दलाची रक्कम खात्यात शिल्लक ठेवली तर पुढील वर्षी मुद्दल आणि व्याजाच्या एकूण रकमेवर व्याज लागू होते.

6. डिजिटल जीवन प्रमाणपत्र

पेन्शनधारकांना पेन्शन मिळविण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र बँकेत जमा करणे अनिवार्य आहे. जर पेन्शनधारकाला हे प्रमाणपत्र शारीरिक दुर्बलतेमुळे स्वतः येऊन जमा करणे शक्य नसेल तर आधार कार्डाशी संलग्न डिजिटल बायोमेट्रिकद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करता येऊ शकेल. या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधेचा लाभ जवळपास १० लाख पेन्शनधारकांना झाला आहे.

7. कर्ज सुविधा

घर किंवा मालमत्तेची खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले दिवस आले आहेत. बऱ्याच बँकांनी पेन्शन खातेधारक ज्येष्ठ नागरीकांना गृहकर्ज देऊ केले आहे. या सुविधेद्वारे ते मासिक उत्पन्नाच्या ५० पट किंवा वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट (७५ लाखांपर्यंत) रकमेचे गृहकर्ज घेऊ शकतात. याची परतफेड करण्यासाठी, दरमहा उत्पन्नाच्या अर्ध्या रकमेचा हप्ता ज्येष्ठ नागरीक भरू शकतात. या प्रकारे वयाची ७५ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा १५ वर्षे हप्ता भरून या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो.

8. स्वस्तात प्रवास 

जे ज्येष्ठ नागरीक प्रवास करु इच्छितात त्यांच्यासाठी अनेक फायदे आहेत. एअर इंडियामार्फत देशाच्या प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी श्रेणीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना ५० टक्क्यांची सूट मिळते. याव्यतिरिक्त, खाजगी विमान कंपन्या ज्येष्ठ नागरिकांना विविध ऑफर्स देतात. भारतीय रेल्वे ५८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना (पुरुषांसाठी ६० वर्षे आणि महिलांसाठी ५८ वर्षे) तिकिटात ५० टक्क्यांची सवलत देते. महापालिका आणि राज्य परिवहन महामंडळांतील बस सेवा देखील ज्येष्ठ नागरीकांसाठी तिकीटदरात सवलत आणि आरक्षित जागांची सुविधा देतात.

9. खास योजना

वरिष्ठ मेडिक्लेम पॉलिसीसारख्या अनेक उत्तम योजना सरकारने ज्येष्ठ नागरीकांसाठी राबविल्या आहेत. २०१७ मध्ये एलआयसीच्या ज्येष्ठ नागरीकांसाठीच्या पेन्शन विमा योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सेवानिवृत्तीनंतर १० वर्षे पेन्शनची हमी दिली गेली आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठी इतर फायदे

या फायद्यांव्यतिरिक्त बँका आणि हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र रांगांची सोय करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर ज्येष्ठ नागरीकांना व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जेणेकरून ज्यांना फार वेळ आधाराशिवाय उभे राहता येत नाही त्यांची गैरसोय होणार नाही. रेल्वे आरक्षणदरम्यान ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य दिले जाते. काही बँकांमध्ये देखील ज्येष्ठ नागरीकांना प्राधान्य दिले जाते.

त्याचप्रमाणे पासपोर्ट सेवा केंद्रात ज्येष्ठ नागरीकांना त्वरित सेवा पुरविली जाते. त्यांना ऑनलाईन माहिती भरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते थेट येऊन पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.

अशा अनेक योजनांद्वारे भारत सरकार ज्येष्ठ नागरीकांसाठी हा देश परिपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

हे आवर्जून वाचामाहिती करून घ्या वयोवृद्ध लोकांसाठी असलेल्या योजनांची

Ask a question regarding भारतीय ज्येष्ठ नागरीकांना मिळणार हे ९ आर्थिक फायदे

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here