2 MIN READ

आपल्या जन्मापासून सोबत असलेल्या, काळजी घेणाऱ्या पालकांना किंवा आजी- आजोबांना घरी एकटे ठेवून जाणे किती कठीण असते हे नव्याने सांगायला नकोच. तरीही नोकरीसाठी, काम-धंद्यासाठी बाहेर तर पडलेच पाहिजे. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्यांसाठी तर ही खूपच कठीण परीक्षा असते. यावर उपाय म्हणून त्यांच्यासाठी केअरटेकर हा पर्याय शोधला जातो. केअरटेकर फक्त काळजी घेण्यासाठीच नव्हे तर गप्पा मारायला, सोबतीला कुणीतरी हक्काचे असावे म्हणूनदेखील.

बऱ्याचदा केअरटेकर कसा असावा हे माहीत नसल्याने शोधणे खूप अवघड जाते. ज्येष्ठांची काळजी घेण्याबरोबर शारीरिक आणि मानसिक गरजाही केअरटेकरला ओळखता यायला हव्या. चला तर पाहूया की, केअरटेकर कशा प्रकारे शोधावा?

केअरटेकर्सचे प्रकार:

केअरटेकर शोधायला सुरुवात करण्यापूर्वी आपली गरज नेमकी काय आहे ते ठरविले पाहिजे. काळजी घेण्यासाठी आणि मदतीला २४ तास सोबत राहणारे, एका ठराविक वेळेसाठी येणारे कोणीतरी पाहिजे किंवा एखादा अपघात वा आजार झाला असल्यास नर्सिंगच्या कामाचा अनुभव असलेले कोणीतरी पाहिजे हे ठरविले पाहिजे.

  • सोबती: काही केअरटेकर्स एकट्या पडलेल्या आणि नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या ज्येष्ठांना सोबत करतात. गप्पा मारणे, कोडी सोडवणे आणि इतर गोष्टींमध्ये त्यांचे मन रमवतात.
  • मदतनीस: ज्येष्ठांना मदत करणारे केअरटेकर्स निवडताना कामाचा अनुभव लक्षात घेणे आवश्यक आहे. अंघोळ, साफसफाई, जेवणे आणि इतर गोष्टींमध्ये ज्येष्ठांना मदत लागते. अशी मदत करणाऱ्या मदतनीसांना वैद्यकीय प्रशिक्षणसुद्धा दिले जाऊ शकते.
  • वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेले केअरटेकर्स: वयोमानानुसार जडणारे विकार जसे की हार्ट अटॅक, स्ट्रोक असलेल्या ज्येष्ठांसाठी निवडलेल्या केअरटेकरने वैद्यकीय प्रशिक्षण घेणे किंवा घेतलेले असणे अनिवार्य आहे. केअरटेकरला जर एखाद्या विशिष्ट आजारात काळजी कशी घ्यावी हे माहीत असेल तर त्या अनुभवाचा नक्कीच फायदा होतो.

केअरटेकर निवडण्यासाठी महत्वपूर्ण टिप्स

तुमच्या ज्येष्ठ प्रियजनांसाठी केअरटेकर निवडताना खालील टिप्स नक्कीच कामी येतील:

  1. तुमची नेमकी गरज ओळखा: ज्येष्ठांना रोजच्या घरातील कामांमध्ये मदत लागते का?, त्यांना विस्मरणाची सवय आहे का?, वारंवार डॉक्टरांकडे तपासणीसाठी जावे लागते का?, त्यांच्याकडे सारखे लक्ष द्यावे लागते का? रात्री त्यांना सोबतीची गरज भासते का? याचा सारासार विचार करून मगच केअरटेकरची निवड करावी.
  2. केअरटेकरचे व्यक्तिमत्व लक्षात घ्या: कधी कधी एखाद्या व्यक्तीला कामाचा किती अनुभव आहे यापेक्षा ती व्यक्ती तुमच्या कुटुंबाशी, ज्येष्ठांशी जुळवून घेते का हे तपासणे जास्त गरजेचे आहे. उमेदवाराला आवडीनिवडी व छंद विचारा जेणेकरून  त्या व्यक्तीचे आणि ज्येष्ठ व्यक्तीचे कोणते छंद मिळतेजुळते आहेत ते समजेल. यामुळे तुम्हाला त्या दोघांचे कितपत जुळेल याचा अंदाज बांधता येईल.
  3. केअरटेकरच्या कागदपत्रांची पडताळणी करा आणि पूर्वी जिथे काम केले तेथील लोकांचे अनुभव ऐका: केअरटेकरकडे ज्येष्ठांची काळजी घेण्याच्या कामाचा परवाना असणे आवश्यक आहे. तसेच मूलभूत ओळखपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. केअरटेकरने स्वतःविषयी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आधीच्या कामाच्या ठिकाणी विचारणा करून मगच केअरटेकरला कामावर रुजू करून घ्यावे.
  4. केअरटेकरबरोबर करारनामा करून घ्या: केअरटेकरच्या कामाचे स्वरूप, पगार, बोनस, सुट्ट्या, कामाची वेळ, सुट्टीवर असताना ज्येष्ठांची सोय करण्यासाठी पर्यायी व्यवस्था, कामाची गोपनीयता, काम सोडतानाची प्रक्रिया या सर्व गोष्टी केअरटेकरबरोबर करार करून त्यात नमूद केल्या पाहिजेत. यामुळे रुजू झाल्यावर काय करायचे किंवा हे करणे अपेक्षित होते वगैरे असे मुद्दे उद्भवणार नाहीत.

केअरटेकर ठेवणे हा फार संवेदनशील आणि भावनिक निर्णय आहे. पण जर योग्य गरज निश्चित केली तर केअरटेकर निवडण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते आणि तुम्हालाही तुमच्या कामात निश्चिंतपणे लक्ष देता येते.

Read this here in English 

Ask a question regarding पालकांसाठी केअरटेकर पाहताना काय लक्षात घ्याल? 

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here