2 MIN READ

जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिनची पातळी खाली येते किंवा शरीर योग्य रीतीने इन्सुलिनचा वापर करू शकत नाही तेव्हा डायबिटीज मेलिटस होतो. इन्सुलिन एक संप्रेरक (हार्मोन) आहे जो आपल्या शरीरात रक्तातील साखरेची (ब्लड शुगर) पातळी नियंत्रित करतो. रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी आपल्या शरीरातील हृदय, डोळे, मेंदू, मूत्रसंस्था अशा बर्‍याच अवयवांत समस्या निर्माण करते. मधुमेह आणि किडनी म्हणजेच मूत्रपिंडाचा आजार एकमेकांशी संलग्न आहे. मधुमेहामुळे किडनीचा आजार होतो किंवा किडनी निकामी होऊ शकते.

मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत: टाइप 1 आणि टाइप 2. टाइप 1 मधुमेह लहान वयातच सुरु होतो. याला किशोरावस्थेतील मधुमेह (ज्युव्हेनाईल डायबिटीज)म्हणूनही ओळखले जाते. मधुमेहाच्या या प्रकारात, शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. टाइप 2 मधुमेह सहसा वृद्धांमध्ये आढळतो. अनुवंशिकतेमुळे लठ्ठ असलेल्या वयस्कर माणसांना या प्रकारचा मधुमेह होतो. यात शरीर इन्सुलिन तयार करते परंतु त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही.

हे आवर्जून वाचा: किडनीस्टोन होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?

मधुमेहाचा किडनीवर कशा प्रकारे परिणाम होतो?

जेव्हा मधुमेह नियंत्रणात नसतो तेव्हा आपल्या शरीरात साखरेची पातळी वाढते. या स्थितीला हायपरग्लाइकेमिया म्हणतात. हायपरग्लाइकेमियामुळे आपल्या शरीराच्या अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते.

टाइप 2च्या मधुमेहाने ग्रस्त असलेल्या सुमारे 10 ते 40% लोकांची किडनी निकामी होण्याची शक्यता असते. खाली दिल्याप्रमाणे मधुमेहामुळे किडनीचे नुकसान होते:

रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे: किडनी फिल्टरिंग युनिटच्या माध्यमातून रक्त फिल्टर करते. या फिल्टरमध्ये असंख्य छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात. हाय ब्लड शुगर लेव्हल या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे तयार करते आणि त्यांना अरुंद बनवते. परिणामी, किडनीला  पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि यामुळे किडनी खराब होऊ लागते. किडनी अकार्यक्षम झाल्याने अल्ब्युमिन नावाचे प्रोटीन या फिल्टरमधून लघवीत येऊ शकते.

मज्जातंतूंचे नुकसान: मधुमेह चेतासंस्थेतील मज्जातंतूंचे मोठे नुकसान करतो. मज्जातंतू आपल्या शरीराच्या सर्व भागांकडून मेंदूपर्यंत माहिती पोहचवतात. खरे पाहता, मूत्राशय पूर्ण भरल्यावर मुत्राशयाकडील मज्जातंतू मेंदूला याविषयी सूचित करतात आणि त्यानुसार मेंदू पुढील सूचना देतो. जेव्हा मधुमेहामुळे मज्जातंतू निष्क्रिय होतात तेव्हा मूत्राशय पूर्ण भरल्याचे मेंदूला सांगण्यात ते अपयशी ठरतात. तसेच या पूर्ण भरलेल्या मूत्राशयाचा दाब किडनीवर पडल्याने किडनीचे नुकसान होते.

मूत्रमार्गावर परिणाम: खराब झालेल्या मज्जातंतूंमुळे मूत्र शरीरातील मूत्रमार्गामध्ये बराच काळ राहते. या मूत्रात असलेल्या बॅक्टेरियांमुळे यूटीआय (मूत्रमार्गातील संसर्ग) होतो. मूत्रामध्ये साखरेची पातळी जास्त असल्याने हे बॅक्टेरिया वेगाने वाढतात. मूत्रमार्गातील संक्रमणावर वेळीच उपचार न केल्याने किडनी निकामी होऊ शकते.

मधुमेहामुळे उद्भवलेली किडनीची समस्या कशी ओळखाल?

 • लघवीत अल्ब्युमिन आढळणे
 • हाय ब्लड प्रेशर
 • पायात गोळे आणि सूज येणे
 • वारंवार लघवी होणे
 • इन्सुलिनची आवश्यकता न भासणे
 • मळमळ, सकाळी आजारी असल्यासारखे वाटणे, उलट्या
 • अशक्तपणा, रक्ताल्पता (ॲनिमिया)
 • खाज सुटणे
 • रक्तात क्रिएटिनाईनचे उच्च प्रमाण

हे आवर्जून वाचा: किडनीच्या विकारांविषयी काल्पनिक गोष्टी आणि तथ्ये

मधुमेहामुळे होणाऱ्या किडनीच्या समस्यांवर उपचारः

डॉक्टर, आहारतज्ञ आणि किडनी स्पेशालिस्ट (नेफ्रॉलॉजिस्ट) मिळून मधुमेहामुळे होणाऱ्या किडनीच्या समस्यांवर उपचार करतात. या उपचारांदरम्यान तुम्ही खालील सूचनांचे पालन करू शकता:

 • रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा
 • हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवा
 • किडनीचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी औषधे घ्या. या औषधांना एसीई इनहिबिटर्स असे म्हणतात. सामान्यत: ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी ही औषधे वापरली जातात. परंतु, ब्लड प्रेशर नियंत्रणात असेल डॉक्टर्स त्यांना ही औषधे सुचवू शकतात.
 • प्रोटीनचे (प्रथिनांचे) मर्यादित सेवन करा
 • मूत्रमार्गाचा संसर्ग झाला असल्यास त्यावर त्वरित उपचार घ्या
 • मिठाचे सेवन नियंत्रणात आणा
 • वेदनाशामक (पेनकिलर) गोळ्यांचा वापर टाळा
 • कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवा

हे आवर्जून वाचा: किडनी प्रत्यारोपण आता होणार स्वस्तात

मधुमेहामुळे किडनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. परंतु आपण वेळोवेळी तपासणी करून आणि त्याकडे लक्ष देऊन किडनीला दीर्घकाळापर्यंत कार्यक्षम ठेवू शकतो.

Ask a question regarding वृद्धपकाळात मधुमेहामुळे किडनीवर होतो का परिणाम?

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here