3 MIN READ

मुंबई येथे वास्तव्याला असणाऱ्या भारती शाह (वय ५३), यांचा शिक्षण, व्यवसाय आणि फिटनेस या क्षेत्रांत उल्लेखनीय अनुभव आहे. भारती यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात शालेय शिक्षिका म्हणून केली आणि पाहता पाहता त्या ३ कंपन्यांच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (मुख्य कार्यकारी अधिकारी) झाल्या. २०१४ साली त्यांना एका साध्याश्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले पण दुर्दैवाने साधारणतः महिनाभर त्या कोमा (बेशुध्दावस्था) मध्ये गेल्या. या घटनेनंतर त्यांनी कामकाजाकडे कमी लक्ष देऊन प्रथम प्राधान्य स्वतःच्या आयुष्याला आणि निरोगी राहण्याला देण्याचे ठरविले. ज्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये त्या कार्यरत होत्या तिथून त्यांनी सेवा निवृत्ती घेतली आणि आहार व फिटनेस याकडे योग्य लक्ष पुरविण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी स्वतःची जीवनशैली आहार आणि फिटनेसच्या माध्यमातून योग्य प्रकारे सांभाळली आहे. त्यांच्या परिवाराच्या आरोग्याविषयी त्या सजग असतात तसेच एका बॉलिवूड अभिनेत्रीला याविषयी त्या मार्गदर्शनही करतात. भारती आणि त्यांची नातवंडे फियोना (वय १०) आणि श्लोक (वय ८) यांच्याशी मायेने वागतात. भारतात होणाऱ्या विविध मॅराथॉन्स मध्ये भारती आणि त्यांचे पती सहभागी होतात.

भारती शहा नातवंडांसमवेत- फियोना (डाव्या बाजूला) आणि श्लोक (उजव्या बाजूला)

हॅप्पी एजिंगच्या वतीने भारती शहा यांनी आपल्या नातवंडांना लिहिलेली, मायेने ओतप्रोत भरलेली, प्रेमळ पत्रे ‘नातवंडांना पत्रे’ या मालिकेमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

या पत्रांच्या माध्यमातून आजी-आजोबा आणि नातवंडांच्या अव्यक्त नात्याचा बंध तर उलगडतोच परंतु आठवणींचा आणि अनुभवांचा वारसा आपल्या नातवंडांना देताना आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोनही आजी-आजोबा या पत्रांतून देतात.

आवर्जून वाचा: Atul Shah Writes a Letter of Wisdom to His Granddaughters

प्रिय फियोना आणि श्लोक,

माझ्या गोड नातवंडांनो, तुम्ही माझ्या जीवनवाहिन्या आहात आणि माझ्या हृदयाला उच्चतम आनंदाची जाणीव तुम्हा दोघांमुळे होते. फियोना, तू आणि मी अगदीच एकसारख्या आहोत. तुला माहित आहे की, आज्जीच्या घरी कोणताही वात्रटपणा तू करू शकतेस. आणि श्लोक, तू खेळाच्या दुनियेत रमणारा आणि घरात इकडे तिकडे पळत राहणारा सरळसाधा मुलगा आहेस. पण माझे हृदय कशाने विरघळतं हे तुम्हा दोघांना माहित आहे का? मला भेटल्यावर तुमच्या रेशमी स्पर्शाच्या बाळमिठीने मी सुखावून जाते.   

फियोना आणि श्लोक, तुम्ही भराभर मोठे होत आहात ही गोष्ट आनंददायी आहे. आता तुम्ही शालेय ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. तुमच्याविषयी काही नवीन ऐकू आले की फार बरे वाटते. मला वाटते, की आयुष्याने तुम्हाला वेगवेगळ्या बऱ्या वाईट अनुभवांनी समृद्ध केले पाहिजे. काही अनुभव तुम्हाला भयावह आणि नकोसे वाटतील पण त्यांवर मात केल्याचा आनंद कैकपटीने मोठा असेल.

तुम्हाला माहित आहे का? तुमच्या या आजीनेही सर्व अवांतर शालेयॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेतला होता. मला आठवतंय, एकदा वादविवाद स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांसमोर बोलायची वेळ आली. मी खूप घाबरले पण माझ्या शिक्षकांनी मला भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. आणि काय झाले सांगा. मी जिंकले. या अनुभवानंतर मला अनोळखी लोकांसमोर बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला आणि मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. यातून सांगायचे इतकेच आहे की, भीतीची दुसरी बाजू काय आहे ते पहा. कदाचित एखादी संधी तुमची वाट पाहत असेल.

संधीबद्दल बोलताना आणखी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. कदाचित तुम्हाला असे कुणीतरी दिसेल ज्याच्याकडे तुमच्यापेक्षा चांगली बॅग, चांगली कार आहे किंवा ज्याची जीवनशैली तुमच्याहीपेक्षा चांगली आहे. तुलना करणं हा आपल्या मनुष्यजातीचा सहज स्वभाव आहे पण दुसऱ्याच्या पुढे जायचे आहे हा विचार अयोग्य आहे. असे कितीतरी लोक या जगात आहेत ज्यांच्याकडे तुमच्यापेक्षाही खूप कमी साधन-सुविधा आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जे काही आहे त्याविषयी समाधानी राहा आणि देवाचे आभार माना.

मोठे होताना तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींतही आनंद मानलेले मला आवडेल. कारण छोट्या गोष्टीच मोठा आनंद देतात. तुम्हाला माहित आहे का, छान छान कपडे घालून खरेदी किंवा फिरायला जाण्यापेक्षा तुमच्यासोबत साप-शिडी खेळण्यात किंवा कोडे सोडवण्यात मला खरा आनंद मिळतो.

“जर लहान वाटणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर स्वतःसाठी नवीन संधी बनविता येतील.”

प्रिय मुलांनो, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे आणि आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. माझी तब्येत बिघडल्यावर मी माझ्या आरोग्याविषयी सजग झाले. जंक फूड टाळून आरोग्याला पूरक आहार घ्या हे तुम्हाला सांगावेसे वाटत आहे. पोषक आहार आणि उत्तम विचार हेच तुम्हाला जीवनाचा लांब पल्ला गाठण्यास मदत करतील करतील.

मला कल्पना आहे की तुमचे आईबाबा एखादी गोष्ट करण्यास किंवा देण्यास नकार देतात तेव्हा तुम्हाला राग येत असेल. पण ते तुमच्या चांगल्यासाठी, तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी असते. तुमचे कुटुंब तुमच्यासाठी चांगलाच विचार करते

“लक्षात ठेवा, युद्ध कितीही कठीण असू दे, त्यामुळे तुम्ही आयुष्य समृद्ध करणं थांबवता कामा नये.”

तुमचे पालक हे फक्त पालक नसून ते तुमचे मित्रही आहेत. तणावाखाली येऊन मुले आजकाल जे टोकाचे पाऊल उचलतात ते पाहून माझ्या हृदयाला घरे पडतात. लक्षात ठेवा, युद्ध कितीही कठीण असू दे, त्यामुळे तुम्ही आयुष्य समृद्ध करणं थांबवता कामा नये. तुमचे पालक आणि तुमचे संपूर्ण कुटुंब कायम तुमच्या पाठीशी आहे.

माझी गोड फियोना आणि श्लोक, शेवटी तुम्हाला एकच सांगते, कधीही हार मानू नका. यशस्वी लोकांना कधी अपयश येत नाही असे नाही, पण ते पडले तरी उठून उभे राहतात. जर तुम्ही हार मानली तर यशाचे फळ कसे चाखाल? तुम्हाला पावलोपावली आम्ही मदत करू.

तुमची प्रेममयी,

आजी

आवर्जून वाचा: Karuna Khatwani’s Heartwarming Letter to Her 4-Year-Old Granddaughter

Ask a question regarding नातवंडांना पत्रे: भारती शाह आपल्या नातवंडांना लिहितात हृदयस्पर्शी पत्रे

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here