4 MIN READ

सिगरेट,  विडी, चिलीम ओढणे म्हणजेच धूम्रपान करणे. एका सिगरेटमध्ये तब्बल ४००० विषारी रसायने असतात. यामुळे केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच नव्हे तर आजूबाजूला उपस्थित असणाऱ्यांच्या फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होतो. वयोमानानुरूप ज्येष्ठ नागरिकांची श्वसनसंस्था कमजोर होते. त्यामुळे दूषित हवेचा सर्वांत जास्त त्रास त्यांना होतो.  धुम्रपानामुळे तब्येतीवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अनेकांनी धूम्रपानाचे व्यसन सोडले आहे.

भारतात पुरविल्या जाणाऱ्या सिगारेटमध्ये डांबर व निकोटीनचे प्रमाण इतर विकसित देशांच्या तुलनेत जास्त आहे. तंबाखूचा धूर व धुम्रपान यामध्ये अनेक विषारी रसायने असतात. त्यामध्ये हायड्रोजन सायनाईड हा विषारी वायू, अमोनिया हे फरशी किंवा स्वच्छतागृह स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, अर्सेनिक हे मुंग्यांना मारण्यासाठी वापरले जाणारे रसायन, नेप्थॅलिन बॉल या कपड्यावरील किटाणूंना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या, ॲसिटोन हे भिंतीवरील रंग व नेलपेंट काढण्यासाठी वापरले जाणारे रसायन, कार्बन मोनॉक्साईड हा कारच्या धुरातील विषारी वायू असतो. गुटख्यामध्ये तंबाखू, सुपारी, चुना, काथ तसेच मॅग्नेशियम कार्बोनेट, शिसे, अर्सेनिक असे विषारी पदार्थ असतात. त्यातील शिसे लहान मुलांच्या बौद्धिक विकासाला घातक असते. गुटखा जास्त दिवस पावडर स्वरुपात रहावा व त्याच्यात गुठळ्या बनू नयेत यासाठी गुटख्यात मॅग्नेशियम कार्बोनेट मिसळतात. थोडक्यात प्राणघातक रसायनांचा भरणा सिगरेट आणि तंबाखूमध्ये केला जातो.  

तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होऊ शकतो. दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना तंबाखूमुळे कर्करोगाचे निदान होते. तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडामध्ये पांढऱ्या रंगाचे चट्टे उटतात. तोंड पूर्णपणे उघडले जात नाही. तिखट मसालेदार पदार्थ खाणे त्रासदायक होते. या प्रकाराचे वेळेत निदान न झाल्यास उपचार करणे कठीण होते. त्याचप्रमाणे केस व तोंडाला दुर्गंध सुटणे, हिरड्यांना इजा, दातांवर काळे-पिवळे डाग, नाकाने वास घेण्याची क्षमता कमी होणे, अकाली वृद्धत्त्व, रोग प्रतिकारकशक्ती कमी होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, एकाग्रता कमी होणे असे अनेक दुष्परिणाम यामुळे होतात.

परंतु तंबाखूसेवन किंवा धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही असे आजार अलिकडे उद्भवल्याचे लक्षात येत आहे. याचे कारण आहे वाढते हवा प्रदूषण. शहरांमध्ये हवेत वेगवेगळे घातक वायू आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे वायू प्रदूषणामुळे आठ दिवस संपूर्ण शहराचे कामकाज बंद झाले होते. वायू प्रदूषणामुळे तयार झालेला विषारी धूर धुक्यात मिसळून नागरिकांसमोर उभा ठाकला. हे धुराचे धुके इतके दाट होते की पहाटे तर सोडाच पण भर दुपारीसुद्धा बाहेर पडणे अशक्य होते. विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली, चेहऱ्यावर मास्क लावून क्रिकेटपटूंना भारत श्रीलंका सामना खेळावा लागला. कित्येकांना उलटी- मळमळ होऊ लागली. लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता शाळा बंद ठेवणे भाग होते. भारताची राजधानी वायू प्रदूषणाची राजधानी समजली जात आहे यासारखे दुर्दैव ते काय? दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे दोन वर्षांच्या आतील दहापैकी चार मुलांना दमा, खोकला यांसारखे आजार होत आहेत. तर पंधरापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांमध्ये ब्रॉन्कायटिस हा फुफ्फुसाचा विकार बळावत आहे. आज दिल्लीमध्ये जे घडत आहे ते आपल्या शहरात, गावागावांत घडायला वेळ लागणार नाही. प्रदूषणाचे दुष्परिणाम आपल्या घराचा दरवाजा ठोठावत आहेत.

आरोग्याच्या समस्यांसोबत झपाट्याने वाढत आहेत त्या पर्यावरणाच्या समस्या. पृथ्वीच्या वातावरणातील संरक्षक ओझोनचा थर विरळ होत चालला आहे. तसेच त्याला छिद्रेदेखील पडत आहेत. यामुळे सूर्याचे प्रखर किरण थेट पृथ्वीवर येऊन आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करणार यात शंका नाही. सूर्याची अतिनील किरणे थेट त्वचेच्या संपर्कात आल्याने  त्वचेचा कर्करोग होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार समोर आलेले काही तपशील पुढीलप्रमाणे:

 • साल 2000 च्या तुलनेत वायू प्रदूषणामध्ये सहापट वाढ  
 • घरात आणि बाहेर होत असलेल्या वायू प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात गेल्या दहा वर्षांत चार पट वाढ
 • जगातल्या दर आठ मृत्यूंमध्ये एक मृत्यू वायूप्रदूषणामुळे होत आहे
 • प्रतिवर्षी प्रदूषणामुळे जगभरात ऐंशी लाख व्यक्‍ती प्राणाला मुकत आहेत.
 • जगात वायूप्रदूषणाचे सर्वाधिक बळी भारत आणि चीनमध्ये

वायू प्रदूषणाची प्रमुख कारणे:

 1. दगडी कोळश्यापासून होणारी वीजनिर्मिती
 2. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचे वाढलेले प्रमाण आणि त्यांच्यातून निघणारा विषारी धूर
 3. खेड्यांमध्ये लाकडे, गोवर्‍या, कोळसा, रॉकेल आदींचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणात केला जाणारा वापर
 4. शेतीसाठी जमीन जाळताना होणारा धूर   
 5. वणवा (जंगलांमध्ये लागणार्‍या आगी)
 6. वाळवंटातील धुळीची वादळे
 7. कारखान्यांमधून निघणारा धूर
 8. एसी, रेफ्रिजरेटर या उपकरणांपासून निघणारा क्लोरो फ्लुरो कार्बन

विषारी घटक

वायू प्रदूषणासाठी कारणीभूत असणारे घटक पुढीलप्रमाणे:

 • कार्बन मोनॉक्साईड: पेट्रोल, डिझेल, लाकूड अशा कार्बनयुक्‍त इंधनांच्या अर्धवट ज्वलनाने हा रंगहीन, गंधहीन वायू उत्पन्‍न होतो. कार्बन मोनॉक्साईडच्या संपर्कात आल्यामुळे श्‍वासावाटे शरीरात प्रवेश करणार्‍या प्राणवायूचे प्रमाण कमी होते, हालचाल मंदावते आणि गुंगी येऊन ती व्यक्‍ती गोंधळलेल्या अवस्थेत राहते.
 • कार्बन डायऑक्साईड: कोळसा, तेल, आणि नैसर्गिक वायू जळाल्याने हा वायू बनतो. याचे प्रमाण वाढल्याने दम लागतो किंवा शुद्ध हरपते.
 • क्लोरोफ्लोरोकार्बन्स (सीएफसी): एअर कंडिशनर्स आणि रेफ्रिजरेटर्समधून हे वायू बाहेर पडतात. हवेत मिसळून ते स्ट्रॅटोस्फिअर (स्थितांबर) पर्यंत वरवर जातात. आणि ओझोनचा थर नष्ट करतात.
 • शिसे: पेट्रोल, डिझेल, शिशाच्या बॅटरीज, घरांच्या भिंतींचे रंग, हेयरडाय यांत शिसे असते. लहान मुलांवर शिशाचे दुष्परिणाम होतात. यामुळे मज्जासंस्था, पचनसंस्था, हाडे, मूत्रपिंडे यांच्यावर दुष्परिणाम होतात. कर्करोग उद्भवण्याची शक्यता असते.
 • ओझोन: पृथ्वीभोवती वातावरणात वरच्या थरात हा निसर्गतःच ओझोनचा थर असतो. या वायूमुळे सूर्यप्रकाशातील हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण होते. मात्र, जमिनीच्या पातळीवर विचार करता, हा अतिशय विषारी असणारा एक प्रदूषण घटक आहे. वाहने, कारखाने यांमधून ओझोनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी वाहणे, वारंवार सर्दी-पडसे होणे आणि न्युमोनियासारखे फुफ्फुसांचे आजार होणे असे त्रास या वायूच्या संपर्कात आल्याने संभवतात.
 • नायट्रोजनऑक्साईड: या वायूमुळे काळे धुके निर्माण होते तसेच आम्लयुक्‍त पाऊस पडतो. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा जाळण्याने हा वायू तयार होतो. हिवाळ्यात नायट्रोजन ऑक्साईडमुळे मुलांना श्‍वसनाचे आजार होतात.
 • कण स्वरूपात हवेत तरंगणारे पदार्थ(एसपीएम): धूर, धूळ आणि वाफ या स्वरूपात खूप काळापर्यंत तरंगणारे घन पदार्थांचे कण हवेत असतात. यापासून स्मॉग बनत असल्याने त्यामुळे अंधुक दिसणे, द‍ृष्टी मंदावणे असे त्रास होतात.  श्वासावाटे हे कण फुफ्फुसात जाऊन सर्दी, खोकला, ब्रॉन्कायाटिस, न्युमोनिया, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग असे विकार होऊ शकतात.
 • सल्फर डायऑक्साईड: हा वायू कोळसा जाळल्यामुळे उत्पन्‍न होतो. औष्णिक विद्युत केंद्रांतून तसेच कागद कारखाना, धातू वितळविणारे कारखाने यांच्यामार्फत हवेत पसरतो. धूम्रधुके, आम्लयुक्‍त पाऊस (अ‍ॅसिड रेन) यांचे हे मुख्य कारण असते. यामुळे फुफ्फुसांचे आजार बळावतात.

प्रदूषणामुळे होणारे आजार

प्रदूषणामुळे होणारे आजार फार भयानक असून वेळीच उपाययोजना न केल्यास यांतील काही आजारांमुळे मृत्यूही ओढवू शकतो:

 • श्‍वसनसंस्था, हृदय आणि रक्‍ताभिसरण संस्था, मज्जासंस्थेचे आजार
 • फुफ्फुसाचा कर्करोग
 • मानसिक ताणतणावामध्ये वाढ
 • अ‍ॅलर्जीचे आजार बळावतात
 • सर्व वयोगटांमध्ये कर्करोगाचा धोका
 • लहान मुलांची स्मरणशक्‍ती आणि बौद्धिक पातळी कमी होण्याची शक्यता

उपाय योजना:

 • शहरे वाढवताना वृक्षांचे संवर्धन करणेही आवश्यक आहे. झाडांमुळे दिवसा प्राणवायू मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात झाडे लावल्यास हे चित्र नक्कीच बदलेल.
 • वाहनांच्या उत्पादन संख्येवर नियंत्रण ठेवणे आवश्यक. दिल्लीतील सम-विषम क्रमांकाच्या गाड्या वापरण्याची पद्धत अवलंबून वाहनांपासून होणारे प्रदूषण रोखता येऊ शकेल.
 • वाहनांची वेळोवेळी दुरुस्ती करून ती धूर कमी सोडतील याकडे विशेष लक्ष पुरविले पाहिजे.
 • सीएनजीसारख्या कमी धूर सोडणाऱ्या इंधनांचा वापर केला पाहिजे.
 • इंधनविरहित सोलर किंवा विजेवर चालणारी वाहने  वापरली पाहिजेत.
 • सार्वजनिक वाहनव्यवस्था उत्तम करून त्याचा प्रचार व प्रसार केला पाहिजे. वैयक्तिक वाहने वापरण्यावर निर्बंध लावले पाहिजेत.
 • कारखान्यांमुळे उत्सर्जित होणारे वायू, मळी आणि इतर प्रदूषक गोष्टींचा योग्य निचरा करणे आवश्यक आहे.
 • स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा, रॉकेल किंवा डिझेल वापरण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
 • खेडी आणि शहरांमध्ये पालापाचोळा, प्लास्टिक कचरा, गवत जाळणे यांवर बंदी घालून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे उपाय सांगितले पाहिजेत.
 • वायुप्रदूषणाविषयीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.

वैयक्‍तिकद‍ृष्ट्या घ्यावयाची काळजी

 • धुम्रपानाइतकेच हानिकारक असलेल्या वायू प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहऱ्यावर मास्क लावणे, गॉगल किंवा झिरो नंबरचा चष्मा वापरणे, घरी आल्यावर डोळे आणि चेहरा धुणे अशा उपाययोजना केल्या पाहिजेत.
 • पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी उत्पादने विकत घेऊ नयेत. फटाके वाजवणे टाळावे. इतर कोणी सार्वजनिक ठिकाणी वायू प्रदूषण करताना आढळ्यास त्याबद्दल योग्य ठिकाणी तक्रार करावी.

मानवाने प्रदूषणाची निर्मिती केली आहे. आग, इंधन, यंत्रे, कारखाने या मानवानेच शोधून काढलेल्या गोष्टींमुळे प्रदूषणाचा हा राक्षस तयार झाला आहे. तो आपल्याला खाऊन टाकण्यापूर्वी आपणच त्याला संपवणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला एक नवे, प्रदूषणविरहित आयुष्य देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

Ask a question regarding प्रदूषित हवेमुळे होणारे परिणाम धुम्रपानाइतकेच घातक

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here