2 MIN READ

सुटलेले पोट, लठ्ठ शरीर असलेले वाहतूक पोलीस आता रस्त्यांवर पाहायला मिळणार नाहीत. तुम्ही म्हणाल, हे काय मध्येच? तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. पुणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी लठ्ठ वाहतूक पोलिसांची एक यादी मागविली आणि नुकतीच त्यांनी अशा पोलिसांची रवानगी वाहतूक विभागाच्या अन्य कामासाठी केली. या यादीत चाळीशी ओलांडलेल्या ६० पोलिसांचा समावेश आहे.

लठ्ठपणाची सुरुवात खरेतर चाळीशीच्या आधीच होते. जेव्हा शरीराचे वजन वाढत आहे हे आपल्या लक्षात येते तेव्हाच यावर उपाय केले पाहिजेत. शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. वय वाढताना शारीरिक क्रिया मंदावतात आणि त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज शरीरात साठून राहतात. या कॅलरीज साठीनंतर सतावू लागतात आणि नंतर लठ्ठपणामुळे हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, हाडांची झीज होणे या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. उतारवयात शरीर लठ्ठ झाल्यावर शरीरातील प्रत्येक संस्थेवर अतिरिक्त भार पडतो. वाढलेल्या चरबीच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचणे कठीण होऊन बसते आणि या समस्या सुरु होतात. उतारवयात या समस्यांचा सामना करणे कठीण होते.

वृद्धापकाळ सुसह्य व्हावा यासाठी लठ्ठपणाच्या समस्येकडे प्रत्येकाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नियमित व्यायाम, पोषक आहार, जीवनशैलीत बदल, बैठी कामे न करता शरीराला व्यायाम मिळेल अशी कामे करणे यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

प्रत्येकाला स्वतःचे वाढलेले वजन दिसत असते पण बदलती जीवनशैली आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांचा मोह टाळता येत नाही. वैयक्तिक पातळीवर लठ्ठपणा कमी करण्याची स्वयंप्रेरणा न आढळल्याने एका सरकारी प्राधिकरणाने काय केले पहा:

वाहतूक नियंत्रण करताना लठ्ठपणाही ठेवा नियंत्रणात

लठ्ठपणाच्या समस्येशी लढा देता यावा यासाठी पंकज देशमुख यांनी ज्या पोलिसांच्या कामात तात्पुरता बदल केला त्यांच्यासाठी फिटनेस सपोर्ट प्रोग्रामसुद्धा सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे लठ्ठपणा आणि शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोलीसांना मदत होईल. ६० पोलिसांची कामे बदलण्यापूर्वी वाहतूक पोलीस विभागातील १००० लठ्ठ पोलिसांचे बॉडी मास इंडेक्स तपासण्यात आले आणि पुण्यातील वेगवेगळ्या वाहतूक शाखांमध्ये कार्यरत असलेल्या निवडक ६० जणांना लठ्ठपणा कमी केल्यानंतर त्यांच्या कामाच्या विभागात परत घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. यासंबंधात आपले मत व्यक्त करताना पंकज देशमुख म्हणाले, “लठ्ठपणा वाढल्यावर धावपळीची कामे करताना शरीरावर मर्यादा येतात. त्यांच्यातील चपळपणा वाढविण्यासाठी मी हा निर्णय घेतला. कामाची वेळ संपल्यानंतर त्यांनी स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष पुरविणे अपेक्षित आहे. पोटाचा घेर कमी झाल्यावर त्यांना स्वतःलाच त्यांच्यात झालेला बदल जाणवेल. जरी त्यांच्या कामाचे स्वरूप तात्पुरते बदलले असले तरीही त्यांचे शरीर फिट झाल्यावर त्यांना लगेच त्यांच्या स्वतःच्या विभागात पुन्हा पाठविले जाईल.”

दोन वर्षांपूर्वी शोभा डे यांनी मतदानादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर लठ्ठपणावरून टीका केली होती. त्यावेळी लठ्ठपणाचे कारण लक्षात न घेता केलेल्या टीकेवर नेटकऱ्यांनी निषेध दर्शविला होता. त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या लठ्ठपणाची कबुली देत त्या लठ्ठपणाचे कारण हे शारीरिक आजार असल्याचे सांगितले आणि त्यावर उपाय काय हे सुद्धा विचारले. तसेच त्याने आपल्या लठ्ठपणाच्या समस्येवर मातदेखील केली. या गोष्टीचा संदर्भ देत देशमुख म्हणाले की, कामातील बदलाच्या शिक्षेसोबत आमचा विभाग लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदतदेखील करणार आहे.

ज्या पोलिसांची कामे तात्पुरती बदलली होती त्यांना याबाबत त्यांचे मत विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही हे सकारात्मकदृष्ट्या घेऊन आमचे वजन कमी करणार आहोत. आमच्या तब्येतीविषयी विभागप्रमुखांना काळजी असल्याची गोष्ट आम्हाला सुखावत आहे.

लठ्ठपणाशी लढा देण्यासाठी एका महाराष्ट्रातील सरकारी विभागाने उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. ज्येष्ठांमध्ये लठ्ठपणाची समस्या अनेक इतर समस्यांसाठी कारणीभूत ठरते त्यामुळे ज्येष्ठांनीदेखील या समस्येवर मात करण्यासाठी आहार आणि व्यायाम यांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

हे जरूर वाचा: पन्नाशीनंतर लठ्ठपणा? या सोप्या व्यायामांनी होईल वजन कमी

Ask a question regarding वयोमानानुसार येणाऱ्या लठ्ठपणावर मात करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा पुढाकार

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here