९७ वर्षीय बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितले त्यांच्या कार्यक्षमतेचे रहस्य

0
2 MIN READ

शिवरायांचा इतिहास केवळ अभ्यासूनच नव्हे तर गिर्यारोहण, लक्षावधी मैलांचा प्रवास करून, टिपणे, नोंदी, संग्रहित पत्रे वाचून शिवरायांची डोळस भक्ती करणाऱ्या, शिवकालीन इतिहासाची सोनेरी पाने शिवचरित्राचे लेखन, नाट्यरूपांतरण, कथाकथन, भाषणे या माध्यमातून तीन-चार पिढ्यांसमोर मांडणाऱ्या सत्याण्णव वर्षीय पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीची संधी मिळाली. २९ जुलै १९२२ रोजी जन्मलेले हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आजही शिवकालीन इतिहास अक्षरशः जगत आहे. आजवर अनेक मुलाखतींतून बाबासाहेबांचा जीवनपट आपल्यासमोर उलगडला आहे. हॅप्पी एजिंगच्या वतीने त्यांना आम्ही हे विचारले की फक्त फिटनेसवर लक्ष केंद्रित करून त्यांनी वयाचा आणि अनुभवाचा हा टप्पा नक्कीच गाठलेला नाही. तर अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे आजही त्यांना आपल्या कार्यक्षमतेवर प्रगाढ विश्वास आहे?

एका खोलीत खिडकीतून येणारा मंद उजेड. त्या उजेडात पुस्तकांच्या सान्निध्यात वर्तमानपत्र वाचत खुर्चीवर बसलेले बाबासाहेब पुरंदरे. सोनेरी काड्यांच्या चष्म्यातून त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि खुल्या दिलाने स्मितहास्य  करून आमचे स्वागत केले. तेजःपुंज चेहऱ्यामुळे त्यांचे वय कळून येत नाही पण त्यांच्या खोलीत पाऊल टाकताच आदराची आणि आपुलकीची भावना मन व्यापून टाकते. 

अभ्यासू इतिहासकार:

इतिहासाविषयी प्रचंड अभिमान, त्यातील तथ्य तपासण्याची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचे झपाटलेपण, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातआहेत. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ही उक्ती त्यांनी वैयक्तिक आयुष्यात अंमलात आणली आहे. सोळाव्या वर्षीपासून घेतलेले शिवकालीन इतिहास अभ्यासण्याचे हे व्रत आजही अखंड सुरु आहे. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे थेंबाथेंबातून प्रेरित करणारा एक विशाल समुद्रच आहे.

प्रभावी कार्यक्षमता: 

आजही चालू घडामोडी वाचून अद्ययावत असणारे पदमविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (फोटो सौजन्य- हिंदुस्थान टाइम्स)

बाबासाहेब आपल्या कार्यक्षमतेविषयी बोलताना म्हणाले, “माझ्या या वयातही काम करण्याचे रहस्य म्हणजे मी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. तसेच मी निर्व्यसनीही आहे. या दोन गोष्टींच्या भांडवलावर माझी आगगाडी चालू आहे.” आजची तरुण आणि वृद्ध पिढी ज्या झपाट्याने नैराश्याच्या आणि व्यसनाच्या गर्तेत अडकत चालली आहे ते पाहून दुःख होते. अशा सर्व लोकांसाठी बाबासाहेब दीपस्तंभासारखे आहेत. बाबासाहेबांनी बोलताना त्यांच्या स्वभावातील अज्ञात असलेला पैलू उलगडला. ते म्हणाले, “मी कुणाचाही द्वेष करत नाही.” एकदा त्यांच्याविषयी फार वाईटसाईट लिहिणारा माणूस त्यांची भेट घेण्यास आला. त्यांनी त्याचे स्वागत केले. त्याला लाज वाटावी, किंवा मन किती मोठं आहे ते दाखवावे यासाठी नव्हे तर तो त्यांचा स्वभावगुण आहे. अतिशय विरळा आढळणारा हा स्वभावगुण म्हणजे बाबासाहेबांच्या ऋषितुल्य स्वभावावर शिरपेच जणू. 

स्मरणशक्तीची दैवी देणगी: 

‘दांडगी स्मरणशक्ती’ ही निसर्गाची मोठी देणगी त्यांच्याकडे या वयातही टिकून आहे. अजूनही कित्येक तारखा, कित्येक घटना त्यांना आठवत आहेत. सामान्य माणसाच्या वृद्धापकाळाशी तुलना करता निसर्गाचा हा चमत्कारच आहे असे म्हणावे लागेल. आपली विनोदबुद्धी त्यांनी अजूनही जपली आहे. त्यांच्याकडे पूर्वी राहायला असणाऱ्या एका व्यक्तीचा नंबर टेलिफोन डिरेक्टरीमधून त्यांनी काढला. ते आम्हाला सांगत होते की, जर १५ दिवसांच्या आत भेटायला नाही आलास तर तुला गोळी घालीन असे मी त्या व्यक्तीस सांगितले. आणि एक मिश्किल हास्य त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.  

जिद्द आणि आशावाद: 

सरतेशेवटी ते म्हणाले, “अजून दोन वर्षे तरी मी काम करीन. शेवटी हे सारे परमेश्वराच्या हातात आहे परंतु माझ्या परीने माझी अभ्यासूवृत्ती जागृत ठेवण्याचा मी प्रयत्न करीन.” 

त्यांचे हे बोल ऐकून बाबासाहेबांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आम्ही मनोमन प्रार्थना केली आणि त्यांना वंदन करून आठवणींची शिदोरी घेऊन जड मनाने त्यांचा निरोप घेतला. त्यांच्या जिद्दीला, महत्वाकांक्षेला हॅप्पी एजिंगचा सलाम!

 

Also read this here in English: https://happyaging.in/mr/watch-97-year-old-historian-babasaheb-purandare-shares-the-secret-of-his-enthusiasm/ 

 

 

Ask a question regarding ९७ वर्षीय बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितले त्यांच्या कार्यक्षमतेचे रहस्य

An account for you will be created and a confirmation link will be sent to you with the password.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here